नमस्कार
आपण दोन्ही हात जोडून जो नमस्कार करतो खरंतर तो समोरच्या व्यक्तिला केलेला नमस्कार नसतोच. एवढचं काय आपण जेव्हा एखाद्या मंदिरात किंवा जिथे जिथे ईश्वराला हात जोडतो तो सुद्धा देवाला केलेला नमस्कार नसतो.
"आपण जेव्हा दोन्ही हात जोडून नमस्कार करतो तेव्हा हाताची पाचही बोटं जुळलेली असतात. ही पाच बोटं आपल्या आयुष्यात आलेल्या काही व्यक्तीकडे निर्देश करतात. या वक्ती सदैव समाधानी राहाव्यात म्हणून आपण नमस्कार करतो."
हात जोडलेल्या अवस्थेत आपल्या हाताचे अंगठे हे आपल्या अंगाला चिकटून असतात, किंबहुना हृदयाजवळ असतात. आपल्या आयुष्यात मोजक्याच अशा व्यक्ती असतात ज्यांचं स्थान आपल्या हृदयात असतं. त्या आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्वाच्या वक्ती असतात; उदाहरणार्थ - आई, वडील, बहीण, भाऊ, मुलगा, मुलगी, पती-पत्नी ज्यांच्याशिवाय आपलं अस्तित्व अपूर्ण असतं. ते नेहमी आनंदी, समाधानी राहावेत म्हणून आपण प्रार्थना करतो. याचंच प्रतीक म्हणजे हात जोडलेल्या अवस्थेत हृदयाशी जोडलेला अंगठा.
त्यानंतर असते तर्जनी. हे बोट दिशा दर्शवण्यासाठी साधारणपणे वापरतात, किंवा एखादं लक्ष्य, ध्येय दाखविण्यासाठी वापरतात. आपल्या आयुष्यात असे काही लोक असतात ज्यांच्यामुळे आपण इथपर्यंत पोचलेलो असतो, ज्यांच्यामुळे आपल्याला दिशा मिळालेली असते, जसे की आपले शिक्षक, मित्र. ते नेहमी सुखी समाधानी व्हावेत म्हणून प्रार्थना करतेवेळी तर्जनी प्रतिकात्मक वापरतात.
त्यानंतर असतं मधलं बोट. हे सर्वात उंच असतं. हे बोट अशा लोकांचं प्रतिनिधित्व करतं ज्यांची ऊंची आपल्या आयुष्याला मार्गदर्शक ठरते. त्या लोकांना कधी पाहिलेलं असो की नसो, ते लोक हयात असो की नसोत, पण ते आपल्याला नेहमी प्रेरणा देत असतात. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्थान आपल्या आयुष्यात खूप मोठं आहे. हे लोक जिथं असतील तिथं सुखी राहावेत किंवा त्यांच्या कार्याला अभिवादन म्हणून हे मधलं बोट.
त्यानंतर त्याच्या बाजूचं बोट अनामिका. हे बोट पाचही बोटांमध्ये कमकुवत असतं. एवढं की आपण ते स्वतंत्रपणे उचलूही शकत नाही, त्याच्या सोबत बाजूच्या बोटांची हालचाल होते. कदाचित यामुळेच की काय, जेव्हा तरुण-तरुणी एकत्र येतात तेव्हा या बोटात अंगठी घातली जाते. अनामिक नातेसंबध अंगठी घातल्यानंतर दृढ होतात. एकटे असताना आपण कमकुवत असलो तरी एकत्र येऊ तेव्हा मजबूत होऊ, या उद्देशाने या बोटात अंगठी घालत असावेत.
आपल्यात असेही काही लोक असतात जे कमकुवत असतात. निसर्गाने त्यांच्यावर अन्याय केलेला असतो. कोणी अपंग असतं, कोणत काही व्यंग असतं. कोणी आर्थिकदृष्ट्या गरीब असतो, आजाराने पीडित, भिकारी. असे जे लोक असतात त्यांनी यातून बाहेर पडावं व त्यांनाही सुख-समाधान मिळावं, यासाठी हे प्रतिकात्मक बोट.
पाचही बोटांमध्ये करंगळी ही सर्वात लहान असते. हे बोट एका 'खास' व्यक्तीकडे निर्देश करतं. जेव्हा आपल्या हृदयाजवळील लोक आनंदी राहतील, जेव्हा आपले दिशादर्शक लोक समाधानी होतील, जेव्हा आपली प्रेरणास्थानं सुखी असतील, जेव्हा कमकुवत लोक मजबूत होतील त्यानंतर एक अशी वक्ती, जी या सर्वांपेक्षा छोटी आहे आणि ती वक्ती म्हणजे 'आपण स्वतः' या सर्व लोकांच्या शेवटी मी सुद्धा समाधानी व्हावं यासाठी करंगळी असते.
"अशा पद्धतीने आपण जेव्हा हात जोडून नमस्कार करतो तेव्हा तो नमस्कार न त्या व्यक्तिला असतो न देवाला. अखंड मानवजातीच्या समाधानासाठी केलेलं ते वंदन असतं."
# संदर्भ : प्रतिश्चचंद्र (डॉ. प्रकाश सूर्यकांत कोयाडे)
Comments
Post a Comment