नशीब
आपलं रोजचं जगणं आपल्याला क्षणाक्षणाला संकेत देत असतं. कोणी याला संधी म्हणतं, कोणी यश, कोणी अपयश, कोणी दुर्दैव तर कोणी शकुन. ज्याला जसं वाटेल तसं तो समजतो. पण शेवटी तो एक संकेतच असतो. रोजच्या जीवनात आपण सतत नकळतपणे संकेताचे अर्थ लावतो व त्यानुसार निर्णय घेतो. घेतलेला निर्णय केवळ एक निर्णय राहत नाही, तर निर्णयाची मालिका तयार होते आणि निर्णयाचा प्रचंड प्रवाह बनतो. कुठलीतरी अज्ञात शक्ति या प्रवाहात सतत आपल्यासोबत असते. आपण एकटे कधीच नसतो. त्या अज्ञात शक्तीला माणसाने दिलेलं नाव म्हणजे - नशीब! निर्णयांचा प्रवाह म्हणजे आपले प्रयत्न आणि त्याला साथ देणारी अज्ञात शक्ति म्हणजे नशीब. प्रयत्नाला नशिबाची साथ असण यालाच म्हणतात.
माणसाचे प्रयत्न या नशीब नावाच्या शक्तिसमोर खूपच तोकडे असतात. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपला जन्म. सार काही आहे त्या जन्मामुळे आणि जन्म घेण्यासाठी आपले प्रयत्न 'शून्य' असतात. कुठली तरी अज्ञात शक्ति आपल्याला अलगद हातांनी या जगात पाठवते. ही शक्ति आपली साथ कधीच सोडत नाही. ती प्रत्येक क्षणाला सोबत राहतेच. या जगात आल्यावर सुरू होते एक मालिका - योगायोगांची आणि अपघातांची. ही योगायोग अपघातची मालिका आपल्या आयुष्याची दिशा ठरवत असते. ही मालिका म्हणजे दुसरं तिसरं काही नसून 'अज्ञात शक्ति' किंवा 'नशीब' त्याचे अस्तित्व आपल्याला दाखवत असते. आपले 'प्रयत्न' किंवा निर्णय घेण्याचा प्रवाह जेवढा मजबूत असेल तेवढं 'नशीब' त्याचं अस्तित्व जास्त दाखवते.
नशीब आजमावण्याचा, त्या अज्ञात शक्तीला जाग करण्याचा उत्तम रस्ता म्हणजे निर्णयांचा प्रवाह वाहता ठेवणं, त्या प्रवाहाला मजबूत बनवणं.
# संदर्भ : प्रतिश्चचंद्र (डॉ. प्रकाश सूर्यकांत कोयाडे)
शेवटी नशीबच.....!!!!!
ReplyDelete