आनंद

मी जगण्याची संधि सोडत नाही. माझ्या समोर आलेला प्रत्येक क्षण मी जगतो. माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येकाशी मी असं बोलतो-वागतो की, ही एकतर माझी पहिली किंवा शेवटची भेट आहे. ही गोष्ट खूप छोटीशी आहे, पण एकदा का याचा अर्थ समजला, की सारं काही सोपं होऊन जातं.

प्रत्येक गोष्टी कडे अशा नजरेनं पहिलं पाहिजे की, एकतर आपण ती प्रथमच पाहतोय किंवा शेवटचं पाहतोय. मग अंदाज बरोबर बदलतो, आनंदाला काहीच तोटा राहत नाही. आनंद आपल्या आयुष्यात येईल म्हणून नुसती त्याची वाट पाहत राहिलं, तर वाटच पाहत राहावी लागते. मी आनंदी आहे, असा स्वतःलाच विश्वास दिला, तरच आनंदी होता येतं.

आज प्रत्येकजण जी धडपड करतोय, प्रयत्न करतोय ते कोणती न कोणती गरज भागवण्याची. गरज ही प्रत्येक गोष्टीस कारणीभूत आहे. माणूस मरतो त्याच वेळी त्याच्या गरजा संपलेल्या असतात. आजच्या घडीला माणसाच्या ज्या महत्वाच्या गरजा आहेत त्यातील सर्वात मोठी गरज म्हणजे 'पैसा'. माणूस कितीही तत्वज्ञानी असेल, कल्पनेच्या जगत वावरत असेल आणि त्याच्याकडे पैसा नसेल तर त्याला कोणीच विचारत नाही. जो खाऊन-पिऊन सुखी असतो त्यालाच वाटते की प्रेम, अध्यात्म, मन:शांती, तत्वज्ञान या गोष्टी महत्वाच्या असतात, पैसा ही दुय्यम गोष्ट आहे. तो कामापुरताच आवश्यक आहे, पण जो खरोखरच एकेका रुपयासाठी झगडलेला आहे किंवा झगडतो आहे, फक्त त्यालाच एक रुपया बैलगाडीच्या चाकाएवढा मोठा दिसतो. 

"कोणाला वाटत नाही जीवनाचा आनंद घ्यावा? कोणाला नाही आवडत जगायला? " प्रत्येकालाच वाटतं कुठं तरी निवांत फिरायला जावं, प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यावा, एखादं संगीत शिकवं, नेहमीचा रस्ता सोडून नवी वाट शोधावी, भटकावं पाय दुखेपर्यंत. नवीन जग पाहावं, नवीन मित्र शोधावेत. प्रत्येकालाच वाटतं, नवीन पुस्तकं वाचावीत, गळा फाडून गाण म्हणावं, पोट दुखेपर्यंत हसावं, प्रत्येकालाच वाटत असतं, आयुष्य हे आयुष्यासारखं जगावं. पण गरजाच भागत नाहीत. मग त्या गरजा आपल्यावर लादलेल्या असोत, स्वतःहून निर्माण केलेल्या असोत व अपघाताने किंवा अचानकपणे आपल्या समोर निर्माण झालेल्या असोत. या गरजा भागविण्यासाठी आपण आपलेपण विसरून जातो.

समजा, लिहिण्याची आवड असणारा एखादा सुशिक्षित तरुण जर नोकरी मिळविण्यासाठी रोज वणवण फिरत असेल, घरच्या एखाद्या कामासाठी किंवा कुटुंबातील कोणाच्या तरी आजारासाठी पैसा नाही म्हणून हतबल असेल आणि त्याच्या खात्यावर जर कोणी दहा लाख टाकले, तर तो दुसर्‍याच दिवशी पुस्तकं लिहायला बसेल आणि त्याच्या भाषेतील अतिशय उत्कृष्ट साहित्यकृती निर्माण करेल.

आपलं रोजचं जगणं, घर, कुटुंब, परिसर म्हणजे एक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलसारखं आहे. इथला प्रत्येकजण आजारी आहे, पर्यायाने प्रत्येकजणच व्हेंटीलेटरवर आहे. धडपडतोय एकेक श्वास घेण्यासाठी, व्हेंटीलेटरमधून निघणारा ऑक्सिजन आपलं आयुष्य एकेका श्वासाने वाढवतो. हा ऑक्सिजन तीन प्रकारचा असतो. वेळ, पैसा, माणूस या तीन गोष्टीवरूनच जगण्याच्या दवाखान्यातील कोणतीही अडचण सुटते. ज्यांचं व्हेंटीलेटर कधीच निघत नाही, तो श्वासांसाठी धडपड करत करत एक दिवस हॉस्पिटल सोडून जातो. आणि ज्याचं व्हेंटीलेटर निघतं तो निसर्गातील शुद्ध ऑक्सिजन घेण्यासाठी बाहेर पडतो. लोकांना मग तो लेखक, संगीतकार, तत्वज्ञानी वाटतो. 


# संदर्भ : प्रतिश्चचंद्र (डॉ. प्रकाश सूर्यकांत कोयाडे) 

Comments

Popular posts from this blog

नमस्कार